Over 4000 free audio and video lectures, seminars and teaching resources from Oxford University.
Skip to Content Skip to Navigation

त्यांनी पाहिलेली विलायत: मराठी प्रवाशांनी १८६७ ते १९४७ या काळात लिहिलेल्या इंग्लंडच्या प्रवासवर्णनांचा सामाजिक अभ्यास

Error loading media: File could not be played
त्यांनी पाहिलेली विलायत: मराठी प्रवाशांनी १८६७ ते १९४७ या काळात लिहिलेल्या इंग्लंडच्या प्रवासवर्णनांचा सामाजिक अभ्यास
Share Video
Share Video
00:00
00:00
 
Duration: 0:18:40 | Added: 21 Dec 2021
Part of the International conference on Maharashtra in September 2021 - Aditya Panse, Independent scholar, London

भारतावरच्या इंग्रजांच्या राजकीय अंमलाची सुरुवात पेशवाईच्या पाडावानंतर, म्हणजे इ० स० १८१८ सालापासून झाली. याचं स्वरूप प्रामुख्याने वसाहतिक होतं, म्हणजे प्रवासाचा, स्थलांतराचा प्रवाह प्रामुख्याने ‘ब्रिटनहून भारतात’ या स्वरूपाचा होता. याचबरोबर, एक उलटा प्रवाहही होता, तो म्हणजे भारतातून ब्रिटनमध्ये जाणाऱ्यांचा.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धाला महाराष्ट्राचा ‘प्रबोधनकाळ’ किंवा ‘पुनरुत्थानकाळ’ (renaissance) म्हणायला हरकत नाही. या काळात इंग्रजी शाळांतून शिकलेली, ‘वाघिणीचे दूध’ प्यालेली, पहिली पिढी बाहेर पडली. मराठी मध्यमवर्गाचा उदयही याच पिढीपासून झाला असे म्हणता येईल. इंग्रजी शालेय शिक्षणामुळे या पिढीने हळुहळू तत्कालीन इंग्रजी समाजाची मूल्ये अंगिकारायला सुरुवात केली. मुद्रित पुस्तकांना ज्ञानस्रोत म्हणून मान्यता मिळणे यालाही याच पिढीपासून सुरुवात झाली. या शिक्षित पिढीने अन्य अर्थांनीही मराठी समाजात बदल घडवून आणायला सुरुवात केली. समाजाच्या जुन्या धारणांत बदल होण्याचा, नव्या धारणांचा उदय होण्याचा, असा तो काळ.

भारतातून ब्रिटनमध्ये, अर्थात ‘विलायतेत’, जाणाऱ्या प्रवाशांची संख्या या काळापासून वाढली. या प्रवासाची कारणे विविध होती : उच्चशिक्षण, सरकारी कामे, कोर्ट-कज्जे, राजकीय / सामाजिक उपक्रमांत भाग घेणे, याबरोबरच ‘टूरिझम’ हा हेतू घेऊनही प्रवास केलेले सापडतात. स्वातंत्र्यपूर्व काळ घेतला, तर विलायतेच्या प्रवाशांमध्ये १८४२ साली प्रवास केलेल्या रंगो बापूजी गुप्त्यांपासून लोकमान्य टिळक, न. चिं. केळकर, आचार्य अत्रे, दादासाहेब फाळके, बाबासाहेब आंबेडकर, बा. सी. मर्ढेकर यांपर्यंत अनेक ठळक नावं सापडतात.

या प्रवाशांनी प्रवासादरम्यान किंवा प्रवासानंतर लिहिलेली प्रवासवर्णने तत्कालीन नियतकालिकांतून प्रसिद्ध होत असत. या प्रवासवर्णनांच्या समकालीनत्वामुळे मौखिक इतिहासाचा उत्तम स्रोत म्हणून या प्रवासवर्णनांकडे बघता येईल. यांना वर वर्णिलेला सुशिक्षित वाचकवर्ग मिळाला, त्यामुळे धारणाबदलांच्या या प्रक्रियेत या स्वातंत्र्यपूर्व प्रवासवर्णनांचा मोठा वाटा असणार असे विधान करता येईल. मराठी समाजामध्ये असलेल्या विलायतेसंबंधीच्या ठळक धारणा काय होत्या हे स्वातंत्र्यानंतरच्या प्रसिद्ध प्रवासवर्णनांतून शोधता येईल.

वरील विधान, अर्थात ‘मराठी समाजात विलायतेबद्दल असलेल्या धारणांचा आणि स्वातंत्र्यपूर्व प्रवासवर्णनांचा काही परस्परसंबंध आहे का?’ हे तपासणे हा या संशोधनलेखाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रस्तुत संशोधनलेखात मराठी प्रवाशांनी लिहिलेल्या विलायतेच्या प्रवासवर्णनांचा अभ्यास करण्याचा मानस आहे. या प्रवाशांचा परिसंचार ज्या देशकालपरिस्थितीत झाला त्याचे खालील पैलू तपासण्याचा हेतू आहे:

१. सामाजिक निरीक्षणे: राजकीय पारतंत्र्यात असलेली व्यक्ती (पक्षी: प्रवासी) आपल्या जेत्याच्या राष्ट्राकडे कोणत्या नजरेने बघते? प्रवाशाच्या राष्ट्रवादाच्या धारणेवर या सामाजिक निरीक्षणांचा कसा परिणाम झाला? त्यांना वर्णद्वेषाचा अनुभव आला का? राष्ट्रवादाच्या भावनेला सामाजिक अनुभवांतून खतपाणी मिळालं का?

२. एतद्देशीय इंग्रजांबद्दलच्या धारणा: प्रवाशांची एतद्देशीय इंग्रजांबद्दलची मतं काय होती? एतद्देशीय इंग्रजांची या प्रवाशांप्रती वागणूक कशी होती? एतद्देशीय इंग्रजांकडून मिळालेल्या वागणुकीमुळे या धारणांत काही बदल झालेला दिसतो का? या मतांचा मराठी समाजाच्या धारणांच्या जडणघडणीवर कसा परिणाम झाला?

३. इंग्लंडस्थित भारतीयांबद्दलच्या धारणा: या प्रवाशांची इंग्लंडास्थित भारतीयांबद्दल काय मतं होती? ती मतं पूर्वग्रहाने प्रेरित होती की निरीक्षणांवर आधारित होती? या मतांचा मराठी समाजाच्या धारणांच्या जडणघडणीवर कसा परिणाम झाला?

प्रवाशांच्या आणि त्यांच्या प्रवासाच्या काही घटकांचा, वैशिष्ट्यांचा परिणाम वरील गोष्टींवर पडू शकतो. त्यामध्ये येतात प्रवाशाचे (अ) लिंग, (आ) प्रवास करतेवेळीचं वय, (इ) आर्थिक परिस्थिती, (ई) प्रवास करतेवेळीचं सामाजिक स्थान, (उ) व्यवसाय, (ऊ) प्रवासाचे कारण, (ए) प्रवासी ज्यात वावरतो ते सामाजिक वर्तुळ, (ऐ) प्रवाशाची राजकीय मतं, वगैरे.

संशोधनाशास्त्राच्या परिभाषेत (अ) … (ऐ) हे स्वचल (independent variables) मानले तर त्याचा परिणाम (१) .. (३) या परचलांवर (dependent variables) पडेल. या परस्परसंबंधाची मांडणी या संशोधनलेखाद्वारे केली जाईल.

People:
Oxford Unit:
Keywords:
Copy and paste this HTML snippet to embed the audio or video on your site: